Thursday, October 25, 2007

आमची सिक्कीम सफर भाग 3

सुमारे अडीच महिने आधी तिकिटे काढली होती. तरी सुद्धा आमचे २ बर्थ डब्याच्या या टोकाला आणि २ डब्याच्या त्या टोकाला होते. टीसी ने सांगितले की डब्यात जागा नसल्याने चौघे एकत्र देता येणार नाहीत. शेवटी प्रवाशांना विनंती करून बघायचं ठरवलं. एक जण पलिकडे जायला तयार झाला. पण दुसरा एकटा असूनही मक्खपणे नकार देता झाला. शेवटी अनुपम त्या टोकाला आणि आम्ही तिघे या टोकाला राहिलो. आमचे सहप्रवासी होते सुरभी ही मेडिकलची विद्यार्थिनी. ( ही बिहारची. धुळ्याच्या मेडिकल कॉलेजात दुस-या वर्षाला शिकते. सुटी लागल्याने महिनाभरासाठी जमालपूर या आपल्या गावी निघाली होती.) आसामचा एक माणूस, जो मुंबईला कोणत्या तरी सिक्युरिटी सिस्टीम बनवणा-या कंपनीत मार्केटिंगचं काम करतो. तो त्याच्या कंपनीच्या सेमिनार्ससाठी गुवाहातीला निघाला होता. त्यानेही इंटरनेटवरून गाडीचा रूट डाउनलोड करून आणला होता आणि वारंवार त्यात डोकं घालून गाडी किती लेट चालते आहे हे सर्वांना सांगत होता. ती मुलगी आणि हा आसामी दोघेही या गाडीने ब-याचदा प्रवास केलेले होते आणि ही गाडी सदैव लेट असते, तिला सर्वत्र सायडिंगला टाकून आणखी लेट करतात हे जाणून होते. आणि तरीही पुन्हा याच गाडीने प्रवासाला निघाले होते. आम्ही तर धास्तावलेलेच होतो. कारण गाडी आधीच साडे तीन तास लेट आलेली, त्यात आणखी किती लेट होते कोण जाणे ! गाडीचा पहिलाच स्टॉप होता बुरहानपूर. तिथे उतरणार होते एक दाढीवाले बोहरी आजोबा आणि त्यांची तरूण सून. सूनबाई डॉक्टर - दुबईला असते. आजच विमानाने मुंबईला उतरली आणि या गाडीने सासरी निघाली होती. ती बरीच बोलकी असल्याने आणि सुरभी मेडिकलची विद्यार्थीनी असल्याने त्यांच्या गप्पा ब-याच रंगल्या होत्या. बोहरी कंपनी बुरहानपूरला उतरल्यावर त्याच्या जागा आम्ही घेतल्या. अनुपम त्याच्या जागेवर निघून गेला. गाडी आता चार तास लेट चालत होती. सकाळ होई पर्यन्त ती सहा तास लेट झाली. रात्री १२ वाजता येणारे जबलपूर सकाळी सहाला आले. आम्ही मस्त झोपलो होतो. आम्ही भुसावळला जशी दिवसभर वाट पाहिली, तशी रात्रभर जबलपूरला गाडीची वाट पाहणारे एक बंगाली कुटुम्ब समोरच्या बर्थवर आले आणि आल्या आल्या झोपी गेले. गाडीतल्या बेडिंग रोलमधे मिळालेली उशी अगदीच लेची पेची असल्याने आम्हा सर्वांचीच पंचाईत झाली. पुढे एका स्टेशनवर जुलेखासाठी एक हवेची उशी घ्यावी लागली तेव्हा ती व्यवस्थित झोपू शकली. खाण्यापिण्यासाठी गाडीतल्या व्यवस्थेवर पूर्णपणे विसंबून राहणे चुकीचे ठरते. त्यांची एकच भाजी असते (बटाट्याची) आणि जेवणाची चवही एकच असते. त्यामुळे सोबत भरपूर खाद्यसामुग्री आणायला हवी. जसं की आमच्या डब्यातल्या एका गुजराती परिवाराने केलं होतं. जाम, जेली, बटर, ब्रेड, चटण्या, लोणची, मुरांबे असा भरपूर जामनिमा सोबत घेऊन ते आले होते आणि सतत त्याचा फडशा पाडत होते.एव्हाना आसामी आणि सुरभी शी चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे आम्ही अंताक्षरी, पत्ते असा टाइमपास करत होतो. सुरभीला भरपूर गाणी येत होती. तिचे वाचन आणि सामान्य ज्ञान बरेच चांगले होते. त्यामुळे कंपनीसाठी चांगली होती. जुलेखाने पत्ते खेळण्याची टूम काढून सर्वांना त्यात सामील करून घेतले. एव्हाना समोरचे बंगाली कुटुम्ब जागे झाले होते. त्यांचा छोटा मुलगा शान फारच गोड आणि बडबड्या होता. त्याची आई सुद्धा आमच्याबरोबर पत्ते खेळू लागली. ते सुद्धा गुवाहातीला जात होते. मधे मुगलसराय स्टेशनवर मिळालेली संत्री आणि आंबे खूपच छान निघाले. त्यामुळे जुलेखा, अनीका, अनुपमचा खूप फायदा झाला. कारण त्यांना गाडीतले जेवण मुळीच आवडत नव्हते. मी आपला आलिया भोगासी असावे सादर म्हणत ते गोड मानून घेत होतो. गाडी आता सात तास लेट चालत होती. एव्हाना तिने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मागे टाकून बिहारमधे प्रवेश केला होता. बिहार मधे कुणीच कायदा पाळत नाही, चालत्या गाडीत लुटालूट होते अशा भयानक कहाण्या सांगून आसामी आम्हाला घाबरवत होता.

No comments: