Thursday, October 25, 2007

आमची सिक्कीम सफर - भाग २

गरम कपडे काय घ्यावे यावरही बराच खल झाला. अनुपम नेहमी प्रमाणे सर्वात शेवटी तयारीला लागला आणि चुकीचे कपडे घेऊन त्याची तयारी एकदाची कशीबशी पूर्ण झाली. ११च्या सकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेसने आम्ही भुसावळला जाण्यासाठी निघालो. चार जण आणि सहा डाग म्हणजे बरेच आटोपशीर सामान होते. एसी मधे उशा गरम पांघरूण मिळते त्यामुळे ते ओझे घेण्याची गरज नव्हती. जेवण सुद्धा चांगले मिळते असे नरेश कडून समजले होते. तरी सुद्धा रात्री साठी जबीन कडे असताना खिचडी बनवून सोबत नेण्याचे ठरले होते. ९ वाजता जबीनच्या गावाला पोचलो. तिच्याकडे कूलर आणि तिची मुलगी असल्यामुळे दुपार कशी गेली ते कळलंच नाही. आमची गाडी (गुवाहाती एक्स्प्रेस) दुपारी ३.३० ला असल्याने अडीच वाजता रणरणत्या उन्हात आम्ही स्टेशनवर पोचलो आणि पहिला धक्का बसला. गाडी साडे तीन तास लेट ! मग आमची वरात पुन्हा जबीनच्या घरी. तिथे पोचलो तर वीज गायब. तास दोन तास घाम गाळत टाइमपास केल्यावर सहा वाजता पुन्हा स्टेशनवर. पण गाडीचा अद्याप पत्ता नाही. सगळ्या गाड्या येताहेत आणि जाताहेत. कर्नाटक गेली, सचखंड गेली. सात वाजून गेले. आम्ही आपले सहा नंबरच्या फलाटावर प्रत्येक घोषणा कानात तेल घालून ऐकतोय. आणि अचानक घोषणा झाली की गुवाहाती सात नंबरपर कुछही पलोंमें आ रही है....! दुसरा धक्का ! आम्ही सामान उचलून सहा नंबरचा जिना चढून सात नंबरवर पळायला लागलो. त्याच वेळी मुंबई पॅसेंजर आलेली. तिची प्रचण्ड गर्दी सात नंबरचा जिना चढू लागली आणि त्याच वेळी गुवाहातीचे आगमन झाले. आम्ही अद्याप जिन्यावरच ! कारण त्या महाभयानक गर्दीतून खाली उतरणे आणि तेही दोन्ही हातात - गळ्यात सामान घेऊन ! शेवटी अक्षरश: रेटारेटी - धक्काबुक्की करून, शिव्याशाप देत आणि घेत आम्ही कसेबसे सात नंबरवर पोचलो. आता एसी थ्री चा डबा कुठे शोधायचा ? कुणी म्हणतो पुढे आहे, कुणी म्हणतो मागे ! असे मागे पुढे पळापळ करत एकदाचे कसेबसे डब्यात घुसलो आणि हुश्श म्हणत जागेवर टेकलो.

No comments: