Friday, September 30, 2022

व्हिडिओ # 460 : समतेचा ६०० वर्षापूर्वीचा हुंकार: संत रोहीदास (ले. श्रीनि...



श्रीनिवास बेलसरे यांच्या खालील लेखाचे हे मी केलेले अभिवाचन असून ते आपल्याला वरील चित्रावर क्लिक केल्यावर ऐकायला मिळू शकेल. जरूर ऐका आणि कसे वाटले ते व्हिडिओ खाली आपला अभिप्राय नोंदवून मला कळवा. जर आपल्याला माझी अभिवाचने आवडत असतील तर जरूर त्यांना लाईक करा, शेअर करा आणि माझ्या विकासवाणी यू ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 

विकास बलवंत शुक्ल

समतेचा ६०० वर्षापूर्वीचा हुंकार: संत रोहीदास’
 
   संत रविदास किंवा संत नामदेव हे दोन्ही संत खरे तर हिंदू ! पण आपण जेंव्हा संत नामदेवांच्या अभंगांचा किंवा रोहीदासांच्या भजनांचा अभ्यास करतो तेंव्हा आपला शीख धर्माबद्दलचा आदर जास्तच वाढतो. या दोन्ही संतकवींना सन्मान दिला तो गुरुनानकदेवांच्या शीख धर्माने ! केवढा सन्मान ? इतका की यांच्या काव्यरचना शीखधर्माचा एकमेव धर्मग्रंथ असलेल्या पवित्र ‘गुरुग्रंथसाहेब’मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. महाराष्ट्रात इथले धर्ममार्तंड जगद्गुरू तुकोबारायांना त्यांची रसाळ गाथा नदीत बुडवायची आज्ञा सोडतात तर तिकडे नामदेवांच्या रचना श्री गुरुग्रंथसाहेबात समाविष्ट होतात ! केवढा विरोधाभास !! शीख धर्माचे केवढे महानपण !
 
वर्णाश्रमधर्माच्या विषमतावादी, प्रतिगामी वास्तवात राहूनही जातीपातीपलीकडे पाहू शकणारे संत येथे झाले. तसेच इतर धर्मातीलही जे चांगले आहे ते स्वीकारणारे धर्मही या देशातच जन्माला आले. इथल्याच संतानी सर्वसमावेशक धर्म, समतावादी विचार दिले. इतरत्र असे होऊ शकले नाही. तेथे ईश्वरापर्यंत जायचा ‘एकमेव मार्ग’ म्हणजे एक विशिष्ट धर्म असे मानले जाई. इतरांना आपल्या धर्माची शिकवण देऊन त्यांचा “उद्धार” करायला शिकविले जाई. काही कट्टरपंथीय विचारधारांमुळे आज सगळे जग जीव मुठीत धरून जगते आहे. कारण माणसाचा वंश नष्ट करणे ‘धार्मिक कार्य’ मानणा-या लोकांमुळे जगभरच्या कोट्यावधी लोकांना प्रवासात, यात्रेत, हॉटेलमध्ये जाताना आधी मेटलडिटेक्टरमधून जावे लागते. विमानतळावर ३/३ तास आधी जावून सामान आणि स्वत:ला तपासून द्यावे लागते. भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ मानली जाते कारण तिने कधीही अमुक एक मार्ग, एकच धर्म श्रेष्ठ आहे असे म्हटले नाही. ईश्वरापर्यंत जायचे अनेक मार्ग असू शकतात, नव्हे, ते तसे आहेतच हा समावेशक विचार भारतीय मूळाच्या विविध धर्मांनी जगाला दिला.
 
अगदी रोजच्या बोलण्यातले उदाहरण घेऊ. “मन चंगा तो कठौती मे गंगा.” ही म्हण आपण नेहमी वापरतो. तिचा जन्म मुळात संतकवी रोहीदास यांच्या एका ओवीतला. संत रोहिदास एक उदारमतवादी संत. एकदा कोणतेतरी पर्व असल्याने लोक गंगास्नानाला निघाले होते. त्यांच्या शिष्याने त्यांनाही यायचा आग्रह केला. ते  म्हणाले, “मी नक्की आलो असतो पण मला एका ग्राहकाचे जोडे आजच द्यायचे आहेत, त्याला वेळ दिली आहे. मी स्नानाला आलो तर वेळ चुकेल आणि माझ्याकडून वचनभंगाचे पाप होईल. मग कसले पुण्य पदरी पडणार? त्यापेक्षा मन निर्मळ असेल तर माझ्या या कमंडलूतही गंगा प्रकट होईल.” आपल्या व्यवसायाशी इमान राखणे, कर्मकांडापेक्षा जास्त महत्वाचे आहे असा वस्तुपाठच त्यांनी यावेळी घालून दिला. यावर एक  दंतकथा अशीही   सांगितली जाते की अशा भक्तीने प्रसन्न होऊन गंगा त्यांच्या कमंडलूत प्रकट झाली होती !
 
रविदासजींचा जन्म  १३९८ साली काशीमध्ये झाला. एका प्रचलित ओवीत म्हटले आहे, “चौदाह सौ तेंतीसको, माघ सुदी पंधरास, दुखियोके कल्याण हित प्रकटे सिरी रविदास.” संत रविदास (उर्फ रोहिदास, उर्फ रैदास) यांचा समाजातील कुप्रथांना  विरोध होता. ते मूर्तीपूजा, तीर्थयात्रा, कर्मकांड याविरुद्ध उघड बोलत. जातीपातीची उतरंड त्यांना मान्य नव्हती. सहाशेपेक्षा अधिक वर्षांपूर्वी त्यांनी लिहून ठेवले आहे-
 
जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात।
रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात। 
 
केळ्याचे पान जसे एकातून एक निघतच राहते. त्याच्या खोडातही स्तर असतात, ते एकसंध नसते तसे जातीपातींचे आहे. जोवर त्या नष्ट होत नाहीत तोवर मानवी समाजात खरी एकता निर्माण होणार नाही. जोपर्यंत जात माणसातून निघून जात नाही तोवर माणूस माणसाशी जोडला जाणार नाही ही भविष्यवाणी त्यांनी तेंव्हा करून ठेवली आहे!  त्यांना सर्व धर्मांचेही आपसात सामंजस्य अपेक्षित आहे. दुस-या एका ओवीत ते म्हणतात –
 
“रैदास कनक और कंगन माहि जिमि अंतर कछु नाहिं।
तैसे ही अंतर नहीं हिन्दुअन तुरकन माहि। हिंदू तुरक नहीं कछु भेदा सभी मह एक रक्त और मासा।
दोऊ एकऊ दूजा नाहीं, पेख्यो सोइ रैदासा।”
 
म्हणजे सोने आणि सोन्याची बांगडी यात फरक तो काय? तसे हिंदू आणि तुर्क (म्हणजे त्यावेळच्या भाषेत मुसलमान) यांच्यात भेद नसतो. सर्वांचे रक्तमांस सारखेच ! अशी अगदी साधी हृदयाला हात घालणारी मांडणी रोहीदासांची होती. उत्तरेत काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘रैदास’ असाही होतो. त्यांना मानणारा मोठा वर्ग उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात आहे. आजही त्यांची पदे नेहमी आपल्या कानावर पडतात. लतादीदींच्या आवाजातील हे पद त्यांचेच आहे -

प्रभु जी, तुम चंदन हम पानी,    
जाकी अँग-अँग बास समानी॥
प्रभु जी, तुम दीपक हम बाती, जाकी जोति बरै दिन राती॥”
 
चातुर्वर्ण्य नाकारताना ते म्हणतात,
 
“ब्राह्मण खतरी, वैस सूद जनम ते नाही. जो चाइह सुबरन कउ, पावै करमन माहि”
 
(अर्थात : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या वर्णाचा आधार जन्माधारित नाही. जन्माने कुणी बुद्धिवान, बलवान, धनवान असत नाही. तो आपल्या कर्माने काहीही साध्य करू शकतो. एकाच बिंदुतून सर्वांची निर्मिती होते मग ब्राम्हण आणि शुद्रात उच्चनीचतेचा भेद कसा?) तत्कालीन धर्ममार्तंडानी रोहीदासांचे ऐकले असते तर कदाचित भारताचा इतिहास बदलला असता. ते म्हणतात –
 
“जात-पांत के फेर महि, उरझी रही सभ लोग. मानुषता कूं खात हई, रविदास जात कर रोग”

(जातीपातीच्या गोंधळात सर्वजण आपापल्या जातीच्या विचारात गुंतले आहेत. त्यामुळे त्यांची विचारशक्तीच संकुचित झाली आहे. तिच्यात माणुसकीला काही जागाच शिल्लक नाही. माणुसकी आज जातिव्यवस्थेच्या रोगाने नष्ट करून टाकली  आहे.) तब्बल ६०० वर्षापूर्वी रोहीदासांनी करून ठेवलेले हे वर्णन आजही भारताला लागू पडते.
 
      अशा मर्मभेदी विचारांमुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना संत रोहीदासांचे विचार खूप भावत. त्यांनी आपले ‘द अनटचेबल’ हे पुस्तक संत रोहीदासानच अर्पण केले आहे. ‘अॅनिहीलेशन ऑफ कास्टस’ या ग्रंथातही रोहीदांसाच्या विचारांचा उल्लेख बाबासाहेबांनी केला आहे. संत कबीर हे रविदासांचे समकालीन! ते गुरुबंधूही होते. त्यांनी रविदासांचा उल्लेख “संतन मे (श्रेष्ठ) रविदास.” अशा गौरवपूर्ण शब्दात केला. रविदासांच्या साहित्यात ‘नारद भक्ती सूत्र, ‘रविदास की बानी’, आणि ‘रविदास के पद’ यांचा समावेश होतो. त्यांनी सर्वसामान्यांना समजणारी भाषा म्हणून मुद्दाम ब्रज भाषेचा उपयोग केला. त्यांच्या लेखनात अवधी, राजस्थानी, खडी बोली, उर्दू आणि फारसी शब्दांचाही वापर दिसतो. रोहीदासांची ४० पदे गुरुग्रंथसाहेबात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यांचे अध्यात्मिक प्रतिपादन होते, ‘या जगातील सर्व गोष्टी नश्वर आहेत. क्षणभंगुर आहेत. मग माणसाने आपल्या देहाचा, शक्तीचा उपयोग लोकसेवेसाठी का करू नये? राम, रहीम, कृष्ण, करीम, राघव ही सगळी एकच ईश्वराला दिलेली वेगवेगळी नावे आहेत. वेद, कुराण आणि पुराणातही एकाच ईश्वराची स्तुती आहे.
 
‘कृस्न, करीम, राम, हरि, राघव, जब लग एक न पेखा।
वेद कतेब कुरान, पुरानन, सहज एक नहिं देखा।‘
 
संत मीराबाईंसुद्धा त्यांच्या वाणीने प्रभावित होऊन त्यांच्या शिष्या झाल्या असे म्हणतात. त्यांच्या शिकवणुकीने प्रभावित होऊन सिकंदर लोदीने त्यांना दिल्लीस येण्याची विनंती केली होती.
 
     संपूर्ण नम्रतेचा पुरस्कार करणा-या या संताने अहंकाराचे सुंदर वर्णन केले आहे – ‘मुंगी साखरेचा एकेक दाणा गोळा करून मधुर अन्नाचा आस्वाद घेते. हत्ती तिच्या कितीतरी पट मोठा असून कधीही साखर खाऊ शकत नाही. त्याचे मोठेपणच  त्याच्या जीवनातील माधुर्याच्या आड येते. ईश्वरभक्तीचा आनंद घ्यायला अंगी नम्रता हवी. ज्याला अहंकार आहे तो ईश्वरभक्तीचा आनंद घेऊ शकत नाही.’ असे संत रोहिदासांचे प्रतिपादन होते.  या दृष्ट्या ईश्वरभक्ताला त्रिवार वंदन ! 
***
©️श्रीनिवास बेलसरे. 9969921283 
 
(वरील लेख दै प्रहारमध्ये 2016 ला प्रकाशित झालेला आहे.  त्यामुळे आवडल्यास नावानिशी शेयर करावा. 🙏😊)