Saturday, March 2, 2024

गिल्बर्ट ग्रेप याला काय खाऊन टाकीत आहे?

 

गिल्बर्ट ग्रेप याला काय खाऊन टाकीत आहे?

 

 

           नमस्कार सिनेरसिकहो. गेल्या आठवड्यात ओगात्तोनामया बांगला देशी उत्कृष्ठ चित्रपटाचा परिचय करून देणार्‍या माझ्या पोस्टला, ती माझी सिनेमागलीवरील पहिलीच पोस्ट असूनही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. वीस एक रसिकांनी मला मेल पाठवून चित्रपटाची लिंक मागवून घेतली आणि ओगात्तोनाम आणि त्यासोबत बोनस म्हणून असलेल्या श्यामोल छाया या आणखी एका बांगला देशी उत्कृष्ठ चित्रपटाचा आनंद घेतला.

           आज परिचय करून देत आहे व्हॉट इज ईटिंग गिल्बर्ट ग्रेपया अमेरिकन इंग्रजी चित्रपटाचा. 1993 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लासे हॉलस्ट्रोम यांनी केले असून जॉनी डेप याने नायकाची म्हणजे गिल्बर्ट ग्रेप याची आणि टायटॅनिक फेम लिओनार्दो डीकॅप्रिओ याने त्याच्या मतिमंद धाकट्या भावाची म्हणजे आर्नी याची भूमिका केली आहे. एका 17 वर्षाच्या मतिमंद मुलाची ही भूमिका इतकी वास्तववादी वठली आहे की लिओनार्दोला त्याकरिता ऑस्कर पारितोषिकाचे त्याच्या जीवनातील पहिले नामांकन मिळाले. हा चित्रपट का बघायला हवा याचे एकमेव कारण सांगा, असे विचारले तर ही भूमिका असे ते सांगता येईल. मात्र चित्रपट बघण्यासाठीचे तेवढेच एक कारण नाही.

           आयोवा राज्यातील एक काल्पनिक गाव एंदोरा येथे ही कथा घडते. गिल्बर्ट ग्रेप हा विशीतला एक देखणा आणि सोनेरी केसांचा तरुण. ज्याच्या खांद्यावर आपल्या पूर्ण परिवाराचे ओझे येऊन पडले आहे. त्याच्या वडिलांनी बांधलेले प्रचंड मोठे पण आता जुने झालेले त्यांचे घर असून त्या घरात गिल्बर्ट, त्याच्या दोन बहिणी, एक भाऊ आणि आई असे सारेजण रहात आहेत. सात वर्षांपूर्वी वडिलांचा आपल्या परिवारातील रस संपला आणि त्यांनी अचानक घराच्या तळघरात गळफास लावून घेवून आत्महत्या केली. त्या दिवसापासून, एरवी अगदी देखणी आणि गमतीदार स्वभावाची आई अचानक बदलली आणि तिने घराबाहेर पाऊल टाकणे सोडले. ती हालचाल न करता एका जागी बसून फक्त खात खात राहिली. इतकी की आता तिचे वजन 250 किलो झाले असून ती एखाद्या देवमाशासारखी अजस्त्र बनली आहे. ती बाहेर कुठे जात नसली तरी तिला बघायला पोरे टोरे खिडकीतून तिच्या घरात डोकावून बघत असतात. गिल्बर्टचे आपल्या आईवर प्रेम आहे पण त्याला तिच्या या वागण्याचा तिटकाराही वाटत असतो.








           त्याच्या दोघा लहान बहिणींपैकी थोरली समजदार आणि प्रेमळ आहे मात्र तिची नोकरी गेली आहे. त्यामुळे ती घरीच आहे. धाकटी संतापी आहे. तिचा व गिल्बर्टचा छत्तीसचा आकडा आहे. त्याचे एक कारण म्हणजे आर्नी.आर्नी मतिमंद आहे आणि त्याने सार्‍या घराला उच्छाद आणलेला आहे. त्याच्यात जबरदस्त ऊर्जा आहे. तो दिवसभर काहीही करत असतो. झाडावर चढतो, छताला लोंबकळतो, गावात एक उंच टाकी आहे तिच्यावर चढून जाणे हा तर त्याचा आवडता उद्योग आहे. त्याला बाबापुता करून खाली उतरवावे लागते. पोलीस दर वेळी गिल्बर्टला तंबी देतात. पण कितीही समजावून सांगितले तरी नजर चुकवून आर्नी ते करतोच. गिल्बर्ट मात्र त्याच्यावर खूप प्रेम करतोय. त्याची एक बहीण आणि आईसुद्धा कायम त्याची कड घेत असतात. दुसरी बहीण मात्र कायम त्याच्यावर राग काढीत असते.          

परिवाराच्या पालन पोषणाचे ओझे गिल्बर्टच्या खांद्यावर आहे आणि त्यासाठी तो एका किराणा मालाच्या दुकानात नोकरी करतो. दुकान लहानसे आहे, जुने आहे. धड चालत नाही. कारण शहराच्या बाहेर एक मोठे सुपरमार्केट आणि फूड मार्ट उघडले आहे. त्यामुळे दुकानमालक आणि गिल्बर्ट चिंतेत आहेत. पारिवारिक जबाबदारीचे प्रचंड ओझे खांद्यावर असूनही तो शांत आहे. त्याच्या मनात स्वत:चा कधी काही विचारच येत नाही. त्याची मैत्रीण जेंव्हा त्याला विचारते की तुला स्वत:साठी काय हवे? तेंव्हाही तो हेच उत्तर देतो की मला आमच्या परिवारासाठी नवीन घर हवे, आर्नीसाठी नवीन मेंदू हवा आणि आईने वजन कमी करायला हवे. त्याला स्वत:ला काय हवे हे त्याच्या डोक्यातच येत नाही.

           चित्रपटाची गती मुद्दामहून संथ ठेवलेली आहे. कारण एका हजारेक लोकवस्तीच्या लहानशा गावातील संथ आणि कंटाळवाण्या आयुष्याची प्रेक्षकांना कल्पना यावी, तिच्याशी ते समरस व्हावे. तसे त्याचे आयुष्य तितकेही रटाळ नाही. थोडासा रुचिपालट त्यालाही लाभत आहे. किराणा दुकानाची ग्राहक असलेली एक विवाहिता त्याच्यावर लट्टू आहे. ती वाणसामान घरी पोहोचवण्याच्या निमित्ताने आपला पती घरी नसतांना गिल्बर्टला आपल्या घरी बोलवत असते आणि त्याला शरीरसुखाचा अनुभव देत असते. हा प्रेमाचा नसून पारस्परिक राजीखुषीचा मामला आहे. प्रेमाचा अनुभव त्याला मिळतो तो बेकी या तरुण   मुलीकडून. ती भटकी आणि स्वतंत्रपणे राहू इच्छिणारी मुलगी आहे. दर वर्षी आपल्या ट्रेलरमधून ती आणि तिची आजी गिल्बर्टच्या गावाजवळ असणार्‍या मोठ्या मैदानात तळ्याच्या काठी आपला ट्रेलर घेऊन येतात आणि महिनाभर मुक्काम ठोकतात. तिला गिल्बर्ट आवडतो आणि ती त्याची मैत्रीण आणि मग प्रेयसी बनते. तिला आर्नीसुद्धा आवडतो. ती त्याला आपला मित्र बनवते. तिला गिल्बर्टच्या आईबद्दल कुतूहल आहे. तिला तिची भेटसुद्धा घ्यायची आहे. मात्र हे कुतूहल कुचेष्टेच्या रूपातील नाही. एकदा आर्नीला पोलीस रात्रभर कोठडीत ठेवून देतात तेंव्हा त्याला सोडवून आणण्यासाठी त्याची आई आपला घराबाहेर न पडण्याचा पण मोडते आणि लोकांच्या नजरा सहन करत, होणारी टवाळी दुर्लक्षित करत पोलीस ठाण्यात येऊन पोहोचते आणि त्याला सोडवून आणते. या तिच्या बहाद्दर कृत्याचे बेकीला खरोखर कौतुक वाटते आणि म्हणून तिला आर्नी व गिल्बर्टच्या आईला भेटायचे आहे.

            आर्नीचा वाढदिवस येऊ घातला आहे. त्याला त्याबद्दल जबरदस्त उत्सुकता आहे. तो सतरा संपवून अठरा वर्षाचा होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो या दिवसाची वाट पहात आहे. त्यासाठी त्याने गावात ज्याला त्याला पार्टीचे आमंत्रणही देऊन ठेवले आहे. बहीण पार्टीसाठी केक बनविणार होती, पण त्याने धावपळ करताना तिला हातातील सर्व सामानासह खाली पाडले. आणि धावपळ का, तर त्याला आंघोळ करायची नाहीये. गेल्या महिनाभरापासून त्याने आंघोळ केलेली नाही. त्याला स्वत:ला आंघोळ करता येत नाही, ती गिल्बर्ट त्याला घालतो. पण एकदा मैत्रिणीला भेटायला जाण्याच्या घाई गडबडीत तो पहिल्यांदा आर्नीला एकट्याला टबात बसवून त्याने आता आपल्या हाताने आंघोळ करावी अशी त्याला तंबीवजा विनंती करतो. तोही ते मान्य करतो. पण शेवटी तो साधारण मुलगा थोडीच आहे? गिल्बर्ट मैत्रिणीसोबत रात्र घालवून घरी येतो तेंव्हा त्याला दिसते की आर्नी रात्रभर टबातच बसून राहिला आहे, पाणी कधीच गार होवून गेले आहे. तो थंडीने गारठला आहे. या प्रसंगापासून आर्नीला आंघोळीचीच धास्ती बसली आहे. गिल्बर्टला तर एवढे अपराधी वाटत आहे की त्याची काही मर्यादाच नाही.

           निदान आजच्या वाढदिवशी तरी मळलेल्या आणि वास मारणार्‍या आर्नीला आंघोळ घालणे गरजेचे आहे. म्हणून गिल्बर्ट आर्नीच्या मागे लागला आहे आणि तो घरात पळापळ करीत आहे. याच पळापळीत त्याची धडक बसून बहीण केकच्या सामानासकट खाली पडते. केकचे साहित्य मातीत मिसळते. आता केक दुकानातून विकत आणावा लागणार. गिल्बर्ट जाऊन तो दुकानातून विकत आणतो. त्यासाठी त्याला गावाबाहेरील मोठ्या फूड मार्टमध्ये जावे लागते. हे त्याच्या मालकालाही दिसते. पण आता काय करणार? शेवटी केकचा खोका आणून फ्रीजमध्ये लपवून ठेवला जातो. ते नेमका आर्नी बघतो आणि त्याला वारंवार हे सांगूनही की  हे एक सरप्राईज आहे, त्याला हात लावायचा नाहीआर्नी केकमध्ये बोटे घालतोच आणि त्याचा सत्यानाश करतो.

           आता मात्र गिल्बर्टच्या संयमाचा कडेलोट होतो. आर्नीला कधी त्याने बोटही लावलेले नसते. उलट सतत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला असतो. मात्र आज तो तूफान चिडतो. त्याला चार गालफटात लगावतो आणि बळजबरीने पकडून आंघोळ घालायला निघतो. पण आर्नी त्याच्या हातातून निसटतो व पळून जातो.

           पुढे काय होते? आर्नी सापडतो का? त्याचा वाढदिवस साजरा होतो का? गिल्बर्टला स्वत:साठी काही मिळते की नाही? त्यांची आई बदलते का?

           ह्या सार्‍या प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रत्यक्ष सिनेमा बघावा लागेल.

           हा नितांतसुंदर चित्रपट पुण्याच्या शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालयाच्या, मराठी प्रेक्षकांना जागतिक सिनेमाची ओळख करून देण्यासाठी, त्यांना मराठी उपशीर्षके (सबटायटल्स) लावून बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमातून मला बघायला मिळाला.

           जर आपल्याला तो बघण्याची इच्छा असेल तर मला माझ्या ई मेलवर मेल पाठविल्यास मी ती लिंक आपल्याला शेअर करू शकेल. माझा ई मेल : vbscsn@gmail.com

          हे करतांना फक्त एक पथ्य पाळायचे आहे. ते म्हणजे हा चित्रपट फक्त आपल्यापुरता आपण बघायचा असून तो कोणत्याही समाजमाध्यमावर (यू ट्यूब वगैरे) टाकायचा नाही.

           चित्रपटाचा अधिक चांगला आस्वाद घेता यावा म्हणून तो मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर न पाहाता, लॅपटॉपवर किंवा स्क्रीनकास्ट करून स्मार्ट टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर पहावा.

 

 

 

Saturday, November 25, 2023

व्हिडिओ # 630 : पुण्याची (अ)पूर्वाई अर्थात बोहरी आळी (ले. अनील अवचट)


अनील अवचट हे माझे अत्यंत आवडते लेखक. आज त्यांचा एक लेख सादर करतोय ज्यात त्यांनी पुण्यातील एक अत्यंत लोकप्रिय जागा आणि कारागिरांची पंढरी मानल्या जाणार्‍या बोहरी आळीचे आपल्या साध्या, प्रांजळ आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीत खुमासदार वर्णन केले आहे. पुण्यात राहणार्‍यांना तर ते आवडेलच पण ज्यांनी अद्याप ह्या जागी भेट दिली नसेल त्यांनाही तिथे एक चक्कर मारावीशी वाटेल. अभिवाचन आवडल्यास जरूर आपले अभिप्राय व्हिडिओखाली नोंदवा.

Sunday, November 19, 2023

व्हिडिओ # 629 : दृष्टीचोर (ले. डॉ. प्रफुल्ल मोकादम, नागपूर) एक माहितीपू...


माझे मित्र डॉ. प्रफुल्ल मोकादम, (नागपूर) हे प्रख्यात नेत्ररोगतज्ञ आहेत. यांनी लिहिलेली ही कथा यंदाच्या तरुण भारत दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. पन्नाशी गाठल्यानंतर आपली दृष्टी म्हणजेच नजर चोरू शकणार्‍या आणि तीही आपल्या नकळत, अशा एका 'दृष्टीचोर' आजाराबद्दल त्यांनी अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत या कथेत सांगितले आहे.
ज्यांनी पन्नाशी गाठली आहे किंवा ज्यांच्या घरात पन्नाशीपुढची ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी ही कथा नक्कीच ऐकायला हवी आणि आपल्या मित्र व नातेवाइकांना ऐकवायला हवी. आशा आहे कथा ऐकल्यावर आपण सावध व्हाल आणि त्यातील सल्ला अमलात आणाल.
आपले अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट करून अथवा खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून अवश्य कळवा.
अभिप्राय आणि सम्पर्कासाठी मो. क्रमांक डॉ. प्रफुल्ल मोकादम (9822200748) विकास बलवंत शुक्ल (9822651010)

Monday, October 30, 2023

व्हिडिओ # 628 - तथास्तु (ले. गुरुनाथ तेंडुलकर)


गुरुनाथ तेंडुलकर यांचा रविवारच्या प्रहारच्या अंकात (29 आक्टोबर 2023) प्रसिद्ध झालेला एक प्रेरणादायी लेख सादर करीत आहे. यापूर्वी मी गुरुनाथ तेंडुलकरांचा 'वेळ मिळत नाही' आणि 'माझा काय संबंध? हे लेख वाचले होते, हे आपल्याला आठवतच असेल. जर आपण ते लेख ऐकले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे. त्या लेखाप्रमाणेच हाही लेख तुम्हाला आवडेल याची खातरी आहे. लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा.

Monday, October 23, 2023

व्हिडिओ # 627 - माझा काय संबंध ? (ले. गुरुनाथ तेंडुलकर)


गुरुनाथ तेंडुलकर यांचा रविवारच्या प्रहारच्या अंकात (23 आक्टोबर 2023) प्रसिद्ध झालेला एक प्रेरणादायी लेख सादर करीत आहे. यापूर्वी मी गुरुनाथ तेंडुलकरांचा 'वेळ मिळत नाही' हा लेख वाचला होता, हे आपल्याला आठवतच असेल. जर आपण तो लेख ऐकला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे. त्या लेखाप्रमाणेच हाही लेख तुम्हाला आवडेल याची खातरी आहे. लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा.

Friday, October 20, 2023

डॉ. सीताराम जाधव (कन्नड) यांच्या सफरचंद बाग आणि गोशाळेस भेट


आमच्या चाळीसगावाजवळील कन्नड येथील एक अभ्यासू आणि प्रगतीशील शेतकरी डॉ. सीताराम जाधव यांनी खडकाळ व बरड जमिनीवर चक्क सफरचंदांची लागवड केली आहे. ती बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो त्याचा हा व्हिडिओ. आम्ही गेलो तेंव्हा डॉ. जाधव यांच्याकडे म.प्र. तून सुप्रसिद्ध कृषि तज्ञ ताराचंद बेलजी हे आलेले होते आणि त्यांची कार्यशाळा आयोजित केलेली होती. त्यामुळे डॉ. जाधव यांच्याशी मोजकेच संभाषण होवू शकले. तरी पुढे कधीतरी पुन्हा आम्ही जाऊ आणि त्यांच्याशी सविस्तर बोलून त्यांच्या प्रयोगाची माहिती घेऊ. तोवर हा एक ट्रेलर आहे असे समजावे. #applegarden #kannad #farming #applefarming #goshala #cowfarming #drseetaramjadhavkannad #drjadhavkannad

व्हिडिओ # 625 डॉ. सीताराम जाधव यांच्या सफरचंद बाग आणि गोशाळेस भेट


आमच्या चाळीसगावाजवळील कन्नड येथील एक अभ्यासू आणि प्रगतीशील शेतकरी डॉ. सीताराम जाधव यांनी खडकाळ व बरड जमिनीवर चक्क सफरचंदांची लागवड केली आहे. ती बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो त्याचा हा व्हिडिओ. आम्ही गेलो तेंव्हा डॉ. जाधव यांच्याकडे म.प्र. तून सुप्रसिद्ध कृषि तज्ञ ताराचंद बेलजी हे आलेले होते आणि त्यांची कार्यशाळा आयोजित केलेली होती. त्यामुळे डॉ. जाधव यांच्याशी मोजकेच संभाषण होवू शकले. तरी पुढे कधीतरी पुन्हा आम्ही जाऊ आणि त्यांच्याशी सविस्तर बोलून त्यांच्या प्रयोगाची माहिती घेऊ. तोवर हा एक ट्रेलर आहे असे समजावे.